गेम खेळताय? आता विमान सांभाळा
"अरे किती वेळ गेम खेळत बसणार आहेस, त्या गेमने काय पोट भरणार आहे का?" तुमच्या मुलांना व्हिडिओ गेम खेळायला आवडत असल्यास, त्यांना मारून मुटकून अभ्यासाला बसवण्यापूर्वी ही बातमी वाचा.
NBC न्यूजच्या एका अहवालात, अमेरिकेतील FAA (फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशन) पुढील पिढीच्या हवाई वाहतूक नियंत्रकांसाठी गेमर भरती करण्याचा विचार करत आहे. विमानातळावर उंच दांड्यावर तबकडी ठेवल्यासारखी दिसणारी इमारत पाहिलीच असेल. या इमारतीत विमानांचे ट्राफिक नियंत्रण करणारे कर्मचारी असतात. त्यांचे काम अतिशय महत्वपूर्ण असते. येणाऱ्या जाणाऱ्या विमानांच्या पायलट्स ला अचूक मार्गदर्शन करणे, समोरच्या स्क्रीन्सवर बारीक नजर ठेवून ग्राउंड क्र्यु आणि विमानांचा समन्वय साधणे हे त्यांचे काम.
हे फ्लाईट कंट्रोलर कर्मचारी पहात असलेली स्क्रीन जवळपास गेमच्या स्क्रिनप्रमाणेच दिसते, त्यामुळे या कामासाठी आता गेमर्स ची भरती केली जात आहे. 18-30 वयोगटातील तरुणांना या कामासाठी लक्ष्य केले जात आहे. हा विशिष्ट वयोगट का? फ्लाईट कंट्रोलर बनण्यासाठी, साधारण ३१ व्या वर्षापर्यंत एंट्री मिळणे आवश्यक आहे आणि वयाच्या ५६ व्या वर्षी निवृत्त होणे भाग आहे.
व्हिडिओ गेम खेळणार्यांची एकाग्रता, जागरुकता आणि समन्वय ही कौशल्ये चांगल्या पद्धतीने विकसित होतात. आपण कोणतेही गेम खेळली असल्यास हे लक्षात आले असेल की प्रतिक्रिया वेळ आणि एकाग्रता महत्त्वाच्या आहेत. गेम मधल्या व्हिलन वर मात करण्याचा मार्ग शोधताना वास्तविक जीवनात ढिम्म असलेली मुले देखील आश्च्यर्यकारक डावपेच लावतात. आईने सांगितलेल्या छोट्या छोट्या कामांना कुरकुर करणारे, गेम खेळताना तासन तास त्या स्क्रीन कडे देहभान विसरून बघत बसतात हा चमत्कारच म्हणायचा. याचा अर्थ जर तुमच्याकडे किंवा तुमच्या मुलांकडे एक चांगली डिग्री आहे आणि ते गेम देखील चांगले खेळू शकतात तर ते आपल्या या कौशल्याचा उपयोग करून एक चांगली नोकरी मिळवू शकतात.
व्हिडिओ गेम्स हा एक छंद मानला जातो, परंतु आधुनिक युगात गेम्स छंदापेक्षा बऱ्याच पुढे गेल्या आहेत. काहीजण व्यावसायिक गेमर्स बनून टुर्नामेंट्स मध्ये कोट्यवधी कमावत आहेत, काही जण गेमिंग कंपन्यांमध्ये नोकरी मिळवत आहेत. आणि आता फ्लाईट कंट्रोलर, ड्रोन ऑपरेटर सारख्या काही नोकऱ्यांसाठी प्रशिक्षण साधन बनत आहेत. अभ्यास, मैदानी खेळ आणि व्हिडीओ गेम्स यांचा समन्वय साधून पालकांनी मुलांना घडवण्याची वेळ आधुनिक युगात आली आहे. खालील बातमी पहा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा