ऍमेझॉन जंगलात हरवलेली ४ मुले सापडली ४० दिवसानंतर
दक्षिण अमेरिका खंडातील कोलंबिया देशात १ मे २०२३ रोजी एक विमान पडले. ऍमेझॉन जंगलातल्या घनदाट भागात पडलेल्या त्या छोट्या विमानात एकूण ७ प्रवासी होते. त्यात कोलंबियातल्या आदिवासी जमातीतील एक आई आणि तिची ४ लहान मुले देखील या अपघातात सापडली. या अपघातात विमानातले तिन्ही वयस्कर दगावले तर सुदैवाने चारही मुले वाचली.
विमानाचे अवशेष सापडायलाच शोधपथकांना २ आठवडे लागले. कोलंबियाच्या सैन्यातील जवान, स्थानिक लोक, या कुटुंबाच्या गावातील लोक जेव्हा या विमानाच्या अवशेषांपाशी पोचले तेव्हा विमानातच त्यांना या आई, पायलट आणि आणखी एक जण असे ३ प्रौढांचे मृतदेह विमानातच सापडले पण मुले कुठेही दिसली नाहीत.
सर्वात मोठा १३ वर्षाचा, दुसरा ९,तिसरी ४ आणि चौथा चक्क ११ महिन्यांचे बाळ हे चारही जण अपघातानंतर ४० साव्या दिवशी सुखरूप शोधपथकांना सापडले तेव्हा कोलंबियामध्ये एकच जल्लोष झाला आहे. आणि जगात सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या जीवघेण्या अपघातातून वाचून त्यानंतर विषारी कीटक, बिबटे, अन्य वन्य श्वापदे भरलेल्या या जंगलात या लहानग्यांनी कसे दिवस काढले असतील हा सर्वत्र कुतूहलाचा विषय आहे. सूर्याची किरणे जमिनीवर पडत नाहीत अशा निबिड अरण्यात एखाद्या प्रौढालादेखील २०-३० पावलावर आपण कुठल्या दिशेला चाललो आहोत याचा अंदाज येणार नाही. अशा परिस्थितीत या मुलांनी हे धैर्य दाखवून जगण्याची जिद्द काय असते हा मापदंड घालून दिला आहे.
११ महिन्याचे बाळ घेऊन ही चिमुरडी मुले या जंगलात ४० दिवस भटकत होती. सैन्याच्या प्रशिक्षित कुत्र्यांना देखील त्यांचा मागोवा घेणे अवघड झाले होते. या श्वान पथकातील एक कुत्रा तर अजूनही सापडला नाहीये. कोलंबिया सुरक्षादलाच्या जवानांनी हेलिकॉप्टर द्वारे आणि जमिनीवर शोधपथकांद्वारे अहोरात्र शोधकार्य चालवून आशा सोडल्या नाहीत.या मुलांच्या आदिवासी जीवन पद्धतीने शिकवलेली जंगलाबरोबर जगण्याची रीत त्यांच्या कामी आली अशी त्यांची आजी म्हणत आहे.
ही बातमी इथे पहा -
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा