अमेरिकन जनता पडतीये AI च्या प्रेमात




२०१३ मध्ये जेव्हा "Her" हा सिनेमा रिलीज झाला होता, तेव्हा AI आधारित चॅटबॉट चांगलेच चर्चेत आले होते. आपल्या रोजच्या कामासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅटबॉटचा सहाय्यक म्हणून वापर करताना एका लेखकाला या रोबॉट च्या "मानवी" भावभावना समजून घेण्याची, त्या स्मरणात ठेवण्याची आणि तशा भावना दाखवण्याच्या क्षमतेचे कौतुक वाटायला लागते. पुढे तो या चॅटबॉट च्या प्रेमातच पडतो. अशा आशयाचा हा सिनेमा. स्कार्लेट जॉन्सन च्या नुसत्या आवाजात एवढी जादू होती की ऑस्कर विजेता अभिनेता वाकिन फिनिक्स ने (Joaquin Phoenix) साकारलेला हा लेखक या चॅटबॉट च्या प्रेमात पडणे ही अगदी स्वाभाविक गोष्ट वाटायला लागते.


 

तरीपण, या सिनेमात दाखवलेली AI सिस्टिम प्रत्यक्षात यायला ३-४ दशके अवकाश आहे असे बऱ्याच जणांना वाटले असेल. काहींनी तर ही एक कपोल कल्पना म्हणून कधी याचा गांभीर्याने विचार देखील केला नसेल. आज जेमतेम १० वर्षात chatGPT सारख्या तंत्रज्ञानाने जगाला गदगदून हलवून उठवावे तसे उठवले आहे. "Her" या सिनेमात दाखवलेल्या आणि त्याहीपेक्षा उन्नत तंत्रज्ञानाची नांदी झाली आहे आणि नवनवीन गोष्टी जवळजवळ प्रत्येक आठवड्यात जगासमोर येत आहेत. स्वचालित कार्स, निबंध, प्रबंधापासून पुस्तक लिहिणारे चॅटबॉट्स, चित्र काढणारे, जुन्या फोटोंना जिवंत करणारे, नैसर्गिक आवाज तयार करणारे, अभिजात संगीत बनवणारे असे अनेक प्रकारचे AI आधारित सॉफ्टवेयर जगात बनत आहेत.

अशाच तंत्रज्ञानावर आधारित आता प्रेमाचा अनुभव देणारे चॅटबॉट्स देखील विकसित केले जात आहेत. काही रिपोर्टनुसार बऱ्याच मोठ्या प्रमाणावर अमेरिकन नागरिक असे चॅटबॉट्स वापरून स्वतःचा जोडीदार असण्याची मानवी गरज कृत्रिमपणे भागवत आहेत असे लक्षात आले आहे.

यावर कडी म्हणजे काही इन्फ्लुएन्सर्स त्यांच्या प्रतिमा आणि आवाज या चॅटबॉट्स वर चढवून त्यांच्यातून व्यावसायिक पणे पैसे देखील कमावत आहेत. ही प्रगती (कि अधोगती) एवढ्या वेगाने होत आहे की यावर नियंत्रण ठेवणाऱ्या संस्था आणि कायदे अजून अस्तित्वात आलेले नाहीयेत. इलॉन मस्क आणि OpenAI चा सॅम आल्ट्मन कदाचित या धोक्यांबाबतच जगाला सूचित करत आहेत.

चॅटबॉट्स का?

एकाकीपणा ही अनेक अमेरिकन आणि पाश्चात्य लोकांसमोरील सामान्य आव्हान आहे. वास्तविक जगात एखादी खास व्यक्ती शोधणे किंवा अर्थपूर्ण कनेक्शन तयार करणे नेहमीच सोपे नसते. रंग, रूप, वैचारिक पातळी, आर्थिक कुवत, आवडी निवडी, भौगोलिक स्थान, राजकीय-सामाजिक मतमतांतरे जुळणे किंवा स्वीकार करून एखाद्याला जोडीदार बनवणे ही कठीण प्रक्रिया आहे. एवढे सगळे प्रयत्न करून मित्र-मैत्रीण किंवा जोडीदार मिळवणे आणि एका भावनिक रोलर कोस्टर वर प्रवास करणे सगळ्यांनाच आवडते, जमते असे नाही. अशा मंडळींच्या आयुष्यात एक पोकळी तयार होऊ शकते ही उणीवच चॅटबॉट्स भरत आहेत. 

कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे चालना दिलेले हे चतुराईने डिझाइन केलेले संगणक प्रोग्राम, हुबेहूब संभाषणे आणि भावनिक आधार तयार करत आहेत. एक साथीदार जो तुमच्यासाठी नेहमीच उपलब्ध असतो किंवा असते, ऐकण्यासाठी आणि सहानुभूती दाखवण्यासाठी तत्पर असतो, तुमच्या बऱ्यावाईट विचारांना पूर्वग्रह न दाखवता समजून घेतो, प्रतिक्रिया देतो, मग तो डिजिटल का असेना बऱ्याच लोकांना हवाहवा वाटत आहे. त्यात पाश्चात्य समाजात पसरत चाललेल्या वैचारिक भेदामुळे प्रत्यक्ष जोडीदार मिळवणे हे दिवसेंदिवस आणखीच कठीण होत चालले आहे.

या प्रकारच्या AI सिस्टिम्स मुळे काही सामाजिक प्रश्न जरी उभे राहिले तरी काही प्रमाणात एकाकीपणाचा प्रश्न तात्कालिक रित्या तरी सुटेल असे वाटत आहे. या सिस्टिम्स चे नियम तयार करेपर्यंत ही 'प्रगती' किती पुढे जाते आहे हे मात्र बघत राहण्यापलीकडे आता आपण काहीच करू शकत नाही अशी शक्यता आहे. प्रत्यक्ष मानवी संबंधातील गुंतागुंत समजून घेण्यासाठी माणसांची संगत आणि सहवासाचा काळ या दोन गोष्टी आवश्यक आहेत. त्याच गोष्टीना या AI सिस्टिम चा शॉर्टकट लागला तर एक संपूर्ण पिढी आत्ममग्न होण्याच्या मार्गावर आहे हा याचा खरा धोका आहे.

विश्वास बसण्यास कठीण वाटत असेल तर खालील NBC न्यूज चा रिपोर्ट पहा.




AI चित्र pixabay वरून साभार.


टिप्पण्या

Popular Articles on This Site

अमेरिकेच्या हवाई द्वीपसमूहातील माऊवी मध्ये लागलेल्या वणव्यात शहर जळून राख

इटलीतल्या गावाने केली सूर्याची व्यवस्था

टायटॅनिक पाहायला गेलेल्या पर्यटकांना जलसमाधी