इटलीतल्या गावाने केली सूर्याची व्यवस्था



विगानेला (Viganella), इटलीमध्ये वसलेले एक छोटेसे गाव, मिलानच्या उत्तरेस 130 किमी अंतरावर खोल दरीच्या पायथ्याशी आहे. पाहायला गेले तर व्हिगानेला एक रमणीय, टुमदार गाव आहे. तरीही या गावाच्या वैशिष्टयपूर्ण भौगोलिक स्थानामुळे येथील रहिवाशांना शतकानुशतके एका कठीण गोष्टीला तोंड द्यावे लागत होते. 

विगानेला एका उंच डोंगराच्या प्रतिकूल बाजूला आहे.दरीमध्ये वसले असल्यामुळे आजूबाजूच्या डोंगरांची लांब सावली गावावर पडते. हिवाळ्यात तर तीन महिने सूर्याचे दर्शनच होत नाही. 11 नोव्हेंबर ते 2 फेब्रुवारीपर्यंत, गावात उन्हाचा बारीक कवडसा देखील येत नाही.

सूर्याचे दर्शन न होणे ही आर्क्टिक वर्तुळातील देशांना नवी गोष्ट नाही. परंतु इटली आर्क्टिक प्रदेशात नाही. पिढ्यानपिढ्या, अशा सुर्यरहित हिवाळ्याची सवय झालेल्या गावकर्यांना 2005 मध्ये, महापौर पिअरफ्रान्को मिडाली यांनी नवीन स्वप्न दाखवले. सुमारे १ लाख युरो चा (८० लाख रुपये) निधी खर्चून या गावाने नोव्हेंबर 2006 पर्यंत, 1,100 मीटर उंचीवर पर्वताच्या विरुद्ध उतारावर 40 चौरस मीटर, 1.1 टन वजनाचा आरसा बसवला. संपूर्ण गाव उजळण्यासाठी हा आरसा अपुरा असला तरी, चर्चसमोरील मध्यवर्ती चौक हा आरशाच्या परावर्तित किरणांचा केंद्रबिंदू म्हणून निवडला गेला. 


संगणक-संचालित ट्रॅकिंगद्वारे, आरसा दिवसभर सूर्याच्या मार्गाचे अनुसरण करतो, अर्धा मैल दूर असलेल्या गावाच्या चौकात सूर्यप्रकाश परावर्तित करतो. ही मनमोहक रोषणाई दररोज किमान सहा तास ३०० चौरस यार्ड क्षेत्र प्रकाशाने उजळते.

या आरशाच्या स्थापनेनंतर, तेथील रहिवाशांच्या मनःस्थितीवर चांगला परिणाम झाल्याचे दिसून आले. पारंपारिकपणे, हिवाळ्यात, लोक चर्च मध्ये प्रार्थना केल्यानंतर त्वरित घरी परततात. तथापि, आरशाच्या साहाय्याने, चर्चच्या प्रांगणात सूर्यप्रकाशाचा खेळ चालू असताना, लोक तेथे बाहेर बराच वेळ रेंगाळतात आणि एकमेकांशी संवाद साधतात.



विगानेला गावच्या या अर्शाने त्याच्या स्थापनेपासून जगभरातील पर्यटकांचे देखील लक्ष वेधून घेतले आहे.

या गावाच्या या यशस्वी प्रयोगांनंतर अशाच प्रकारे नॉर्वे मधील रुकान (Rjukan) नावाच्या एका गावाने अशा प्रकारचे आरसे पर्वतांवर बसवले आहेत.




----
चित्रे इंटरनेट वरून साभार.

टिप्पण्या

Popular Articles on This Site

अमेरिकेच्या हवाई द्वीपसमूहातील माऊवी मध्ये लागलेल्या वणव्यात शहर जळून राख

टायटॅनिक पाहायला गेलेल्या पर्यटकांना जलसमाधी