टायटॅनिक पाहायला गेलेल्या पर्यटकांना जलसमाधी

अटलांटिक महासागराच्या तळाशी सुमारे १३ हजार फूट खोलवर पसरलेल्या टायटॅनिक जहाजाच्या अवशेषांचे दर्शन घ्यायला गेलेल्या ५ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे असे आज जाहीर करण्यात आले.

अटलांटिक महासागरात गेल्या शतकभरापूर्वी बुडालेली टायटॅनिक अजूनही जगभरात कुतूहलाचा विषय आहे. १९९७ साली आलेल्या याच नावाच्या सिनेमामुळे टायटॅनिक परत एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर या विषयावर कितीतरी डॉक्युमेंटरी निघाल्या. 


१९१२ साली अटलांटिक महासागरात अज्ञात ठिकाणी बुडालेल्या टायटॅनिक चे अवशेष १९८५ साली फ्रेंच-अमेरिकन शोधपथकांना सापडले. हे शोधकार्य आणि एक तरल प्रेमकथा गुंफलेल्या कथेवर टायटॅनिक सिनेमाने जगभरात तुफान कमाई तर केलीच वर जगभरातल्या साहसवेड्या लोकांना नवीन आकर्षण दिले.

समुद्रात १३००० फूट खोलवर जमीनवर असतो त्यापेक्षा ४०० पट जास्त दाब असतो. त्यामुळे अगदी भल्याभल्या लष्करी पाणबुड्या देखील अशा खोलीवर जात नाहीत. पर्यटनासाठी आणि संशोधनासाठी खास धातू आणि कॉम्पोसिट्स पासून बनवलेल्या भक्कम छोट्या पाणबुड्याच तिथे पोहोचु शकतात.

अशाच एका 'टायटन' नावाच्या पाणबुडीने ५ दिवसापूर्वी (१८ जून २०२३) या खोल महासागरात ५ जनांसह बुडी घेतली. आणि तीच या पाणबुडीची शेवटची यात्रा ठरली.


गेले पाच दिवस अमेरिकन, कॅनेडियन नौदलाने मिळून हजारो चौरस किलोमीटर समुद्रतळ पिंजून काढला तरी या पाणबुडीचा सुगावा लागत नव्हता. शेवट आज २३ जून रोजी कॅनेडियन रोबोटिक पाणबुडीने टायटॅनिक च्या अवशेषांपासून १६०० फुटावर या तळाशी टेकलेल्या पाणबुडीचा शोध लावला. आणि या शोधकाऱ्याचा असा करूण शेवट झाला.

पाण्याच्या दाबात चिरडली गेली टायटन पाणबुडी

समुद्रसपाटीपासून ४०० पट जास्त दाब म्हणजे एखाद्या इनोव्हा कार वर ९० मजल्याची एम्पायर स्टेट बिल्डिंग ठेवल्याएवढा दाब. असा प्रचंड दाब सहन करण्यासाठी टायटन बनवली गेली होती. आणि या पाणबुडीची ही सफर करायला २.५ लाख डॉलर (सुमारे २ कोटी रुपये) मोजून या ५ साहसवीरांनी तिकीट घेतले होते.

यात टायटन पाणबुडी सफारी चालवणाऱ्या कंपनी - ओशनगेट चे CEO स्टॉकटन रश, संशोधक आणि अब्जाधीश हमिश हार्डिंग, ब्रिटिश-पाकिस्तानी उद्योजक शहाजादा दाऊद आणि त्यांचा १९ वर्षांचा मुलगा सुलेमान आणि प्रसिद्ध संशोधक पॉल-ऑन्री नारजुले (Paul-Henri Nargeolet) हे होते.

प्रचंड खर्चिक शोधकार्य

ही पाणबुडी शोधण्यासाठी अमेरिका, ब्रिटन, फ्रांस, कॅनडा यांनी संयुक्तपणे प्रयत्न केले. तरी या पाच जणांचे मृतदेह कदाचित तिथेच राहतील कारण या शोधकार्याचाच खर्च कोण देणार यावर एकमत नाहीये तर ही पाणबुडी वर काढण्यासाठी अजून बराच खर्च येऊ शकतो.

त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट मानता येईल कि या सर्वांचा मृत्यू तडफडून न होता एका झटक्यात झाला असल्याची शक्यता आहे. जर ही पाणबुडी दाबाखाली चिरडून नष्ट झाली नसती तर ५ दिवस या सर्वांचा तहान भूक आणि ऑक्सिजन च्या कमतरतेमुळे नक्कीच मृत्यू झाला असता.



अमेरिकन नेव्ही ने पकडला होता आवाज

रविवारी स्फोटसदृश आवाज अमेरिकन नौदलाच्या जहाजांनी समुद्रतळावरून पकडला होता असे आता सांगण्यात येत आहे.  या घटनेमुळे टायटॅनिक परत एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली असली, तरी मागच्याच आठवड्यात ग्रीसच्या किनाऱ्यावर ३०० निर्वाश्रितांचा नौका उलटून झालेल्या मृत्यूची बातमी मात्र झाकोळली गेली आहे.

या बातमीचा हा व्हिडीओ 


चित्रे इंटरनेट वरून साभार.
gif चित्रे westernjag.com ने बनवली आहेत

टिप्पण्या

Popular Articles on This Site

अमेरिकेच्या हवाई द्वीपसमूहातील माऊवी मध्ये लागलेल्या वणव्यात शहर जळून राख

इटलीतल्या गावाने केली सूर्याची व्यवस्था